Friday, October 2, 2020

'गांधी' जयंतीच्या 'सावरकरी' शुभेच्छा !

 


© पार्थ बावस्कर


"महात्मा गांधींच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांचे नि आपल्या राष्ट्राचे हृदयपूर्वक अभिनंदन करतो. ईश्वराने त्यांना दीर्घायुष्य नि उत्तम आरोग्य द्यावे."

--स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर दि. २ ऑक्टोबर १९४३ 

आज महात्मा गांधीजींचा वाढदिवस !

आपल्या देशात महात्मा विरुद्ध स्वातंत्र्यवीर ही  लढाई गेली कित्येक वर्षे सुरु आहे. अर्थात याचे बिनीचे शिलेदार असतात स्वतःला दोघांचे 'अनुयायी' म्हणवून घेणारे 'भक्त'च !

गांधी आणि सावरकर यांच्यात टोकाचे वैचारिक मतभेद होते हे ऐतिहासिक सत्य आहे. तरीही या मतभेदाच्या पलीकडे जाऊन सावरकरांनी गांधींबद्दल वेळोवेळी काढलेले निवडक उद्गार आजतरी आठवूया. 

१.  मी आता प्रथम अगदी पूर्व काळातील म्हणजेच 1908 मधील गांधीजींचे आणि माझे सार्वजनिक आणि वैयक्तिक संबंध कसे होते ते सांगतो. त्यावेळी गांधीजी सुविख्यात पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या, माझ्या व्यवस्थेखाली आणि मार्गदर्शनाखाली असलेल्या लंडनमधील इंडिया हाऊस मध्ये रहात होतो. तेथे गांधीजी आणि मी मित्र म्हणून एकत्र राहिलो. देशभक्त म्हणून एकत्र काम केले. त्यानंतर काही वर्षांनी ते स्वतः त्यांच्या पत्नीला मला व माझ्या कुटुंबाला भेटावयास आले आणि त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या मैत्रीसंबंधी आणि चालू राजकारणासंबंधी सुखसंवाद करण्यात काही तास घालवले....आमच्या ध्येयात काही प्रकरणी जरी मूलभूत अंतर असले तरीही आमचे परस्परसंबंध, आदर नि सदिच्छा सतत टिकून होती.

 २. १९४३ साली गांधजी उपोषणाला बसल्यानंतर सावरकरांनी काढलेल्या निवेदनातील काही भाग.

...ज्या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात टाकणारे उपोषण आरंभले आहे, ते राष्ट्रच सांगत आहे की या क्षणाला गांधींचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. आपल्या रागावण्याला किंवा चिडण्याला सरकार शरण येण्यापेक्षा आपल्या राष्ट्रीय इच्छेपुढे गांधींनीच नमते घेणे अधिक शक्य आहे. कारण आम्हाला माहीत आहे की, गांधीजींनी अनेकदा महान राष्ट्रहित लक्षात घेऊन नैतिकतेचे अवडंबर न माजविता आपली उपोषणे सोडली आहेत. यासाठी दिल्ली परिषदेला आलेल्या सर्व नेत्यास माझी विनंती आहे की त्यांनी गांधीजींनाच उपोषण सोडण्याची विनंती करावी.

३. कस्तुरबा यांचे निधन झाल्यावर दि. २३ फेब्रुवारी रोजी सावरकरांनी गांधीजींना पाठवलेली तार.

"कस्तुरबांच्या निधनासंबंधी मी हृदयपूर्वक दुःख व्यक्त करतो. विश्वासू पत्नी नि प्रेमळ माता, देव नि मानव यांची सेवा करतांना त्या उदात्त मार्गाने देवाघरी गेल्या, तुमच्या दुःखात सर्व राष्ट्र सहभागी आहे."

- सावरकर

४. गांधीजी स्थानबद्दतेतून सुटल्यावर सावरकरांनी लिहिलेले निवेदन दि. ७ मे १९४४

" गांधीजींचे वाढते वय, वाढता आजार नि खालावलेली प्रकृती लक्षात घेऊन शासनाने गांधींची सुटका केली हे वृत्त ऐकून सर्व देशाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. ही कृती मानवी होती. गांधीजी लवकर बरे होवोत अशी इच्छा मी व्यक्त करतो."

- वि. दा. सावरकर

५. ....माझा नि गांधीजींचा तात्विक नि प्रत्यक्ष मतभेद असला तरी त्याचा वाईट प्रभाव वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामावर होऊ नये अशी दक्षता आम्ही घेत होतो. महात्मा गांधींच्या वधाची अचानक धक्का देणारी बातमी मला समजली तेंव्हाच मी त्या भयंकर आत्मघातकी कृतीचा नि:संदिग्ध शब्दात निषेध केला आणि आजही मी तशाच नि:संदिग्ध शब्दात गांधीवधाचा निषेध करतो.

... एखाद्याच्या वेडेपणामुळे किंवा सामुदायिक प्रक्षोभामुळे करण्यात आलेल्या भयंकर भ्रातृहत्यांचा मी नि:संदिग्ध शब्दात निषेध करतो. प्रत्येक देशभक्त नागरिकाने आपल्या अंत:करणावर हे ऐतिहासिक सत्य करून ठेवावे की यशस्वी झालेली राष्ट्रीय क्रांती आणि नवनिर्मित राज्य यांना विशेषतः परकीय आक्रमणाचा धोका असताना भावभावनांचा प्राण घेणारा अंतर्गत नागरी युद्धासारखा अन्य भयंकर शत्रू नाही.

- सावरकर

( ऐतिहासिक निवेदने )

वर्तमान राजकारणाशी याची सांगड घालणेच नको !

महात्मा आणि स्वातंत्र्यवीर दोघेही वरून बघताहेत फक्त !!

-- © पार्थ बावस्कर

1 comment: