Saturday, May 11, 2024

स्वरगंधर्व - एक सिनेमॅटिक स्वरमैफल !

 स्वरगंधर्व - एक सिनेमॅटिक स्वरमैफल !



सुधीर फडके यांच्यावचा बायोपिक रिलीज होऊन आठवडा झाला, पण मध्यंतरी डोळ्यांना झालेल्या इन्फेक्शन मुळे चित्रपट बघायचा राहून गेला, अन्यथा १ मे रोजी पहिल्या शो-ला जायचं ठरवलं होतं. 


बाबूजींच्या तोंडून सावरकरांच्या ‘ने मजसी ने’ कानावर पडल्या आणि मी जागीच खिळलो, तो संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत ! 


मुळात बाबूजींचा संघर्ष लोकांना ज्या माहीत नाही, तो जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा या अंगाने अनेकांनी लिहिलय आतापर्यंत, पण मला तीनचार मोलाच्या गोष्टी सांगायच्यात त्या जरा वेगळ्याच. 


सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुनील बर्वे यांनी बाबूजींच्या व्यक्तिरेखेत ओतलेला जीव बघण्यासाठी हा चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहीन. जवळजवळ अडीच तास बर्वे, तुमच्यावरून नजर हटत नाही हो ! खूप कमाल काम केलंय. मेकअप करुन बाबूजी दिसणं फार कठीण नाही पण जो आंगिक अभिनय केलाय तो खूप मोलाचा. बाबूजींचे हातवारे, गातांना विशिष्ठ शैलीत फिरणारा त्यांचा हात, पेटी धरण्याची तऱ्हा, हे सगळं सुनील बर्वे यांनी लीलया पेललं, बाबूजींची भाषा आत्मसात केली, ती अभिनित केली, हे फार महत्वाचं ! 


चित्रपटाच्या पहिल्या भागात बाबूजिंचीच गाणी त्यांच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर पेरली आहेत, जणू ती त्यांचं आयुष्य डिफाईन करतात अशी. ती फार चपखल वाटतात, त्यांच्या मित्राची आई चहा आणून देते तेंव्हा मागे ‘लिंबलोण उतरू कशी’ हे गीत सुरू होतं, आणि पापण्यांच्या कडा ओलावतात. म्हणून पहिल्या टप्यात पटकथा काहीशी ढिली वाटली तरी प्रेक्षक गाण्यात रमतो. 


दुसऱ्या भागात तर बाबूजींच्या गाण्याची रचना आणि त्याचे प्रसंग आलेत. माडगुळकरांचे आणि त्यांचे सीन्स खुसखुशीत पण भावस्पर्शी आहेत. गीत रामायण निर्मितीचा क्षण तर सगळ्यांच्या हृदयी भिडणारा. माडगुळकर आणि बाबूजी यांच्यासोबतच आशाबाईंच्या भूमिकेला छान  ठेहराव दिला गेलाय, त्यामुळे ती भूमिकाही स्मरणीय. 

डॉ. हेडगेवार आणि अटलजी यांच्या पाहुण्या व्यक्तीरेखा बघून त्या काळात गेल्याच फील येतो. दादरा नगर हवेलीचा सशस्त्र लढा या निमित्ताने पडद्यावर आलाय ही एक वेगळी अचिव्हमेंट, नाहीतरी इतिहासाच्या पुस्तकातून हरवलाय तो केंव्हाच !  


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल प्रेम, आपलुकी, निष्ठा असेल तर चित्रपट बघाच पण नसेल तरीही बघा, संघ हा एकदा आपलं ज्याला म्हणतो त्याच्या पाठीशी कसा उभा राहतो हे कळेल. उगाच नाही एखादं संघटन एक शतक होईतो इतक्या अभिमानाने व्रतस्थ राहू शकतं. सावरकर विचारांची कास धरलेल्या माणसाला किती आणि कसं पोळून निघावं लागतं हेही जाणवेल पडद्यावर बाबूजींना बघून. 


बाबूजींची गाणी मोबाइल, स्पीकर किंवा इतरत्र ऐकतोच ना आपण, पण स्पेशल, त्यांना बघता बघता ती गाणी ऐकायची मजा, अनुभव, अहसास, हवा असेल तर चित्रपटगृहात जा, एक सिनेमॅटिक स्वरमैफल तुम्हाला बघता बघता ऐकायला मिळेल. 


- पार्थ बावस्कर

( लेखक, इतिहास अभ्यासक, नाट्यचित्रपट आस्वादक ) 

Wednesday, August 4, 2021

हेच खरे टिळक !

 हेच खरे टिळक ! 

उठसूट कुणीही यावे आणि टिळकांबद्दल नको ते लिहावे हे आता फार काळ चालणार नाही, डॉ. निशांत पाटील नावाच्या कुणीतरीचा आक्षेप आहे, त्याला ही उत्तरे आणि काही प्रश्नसुद्धा ? खरतर अशांची आजीबात दखल घेऊ नये, पण आपल्यापैकी तरुण पिढीचा गैरसमज होऊ नये म्हणून हे लेखन. जास्तीत जास्त शेअर करावे.

अथणीच्या सभेचा सतत उल्लेख होतो पण त्यात टिळक काय म्हणाले होते ब्राह्मणांनी पळीपंच पात्रासह कौन्सिलात जाऊन काय संध्या करायची आहे काय ? असा प्रश्न विचारला होता हे का सांगत नाही ? यापुढे जाऊन टिळक म्हणतात “कायदेकौन्सिलात उद्या सगळेच ब्राह्मणेतर आले तरी मला चालतील, पण तेथे लोकनियुक्त हिंदूंचे प्राबल्य असले पाहिजे, परक्यांचे किंवा सरकारनियुक्तांचे प्राबल्य नसले पाहिजे.” कायदेकौन्सिलात उद्या सगळेचं ब्राह्मणेतर आले तरी चालतील असे लोकमान्य म्हणतात. टिळकांनी आपल्या मुलांना स्वतः सांगितले होते की तुम्ही उद्या चपला शिवायचा व्यवसाय केला तरी मला आनंदच होईल, यावरून तिलक किती पुढारलेले होते याची कल्पना येईल.

२३ मे १९१७ रोजी नाशिकच्या भाषणात टिळक म्हणाले होते, “स्त्री शिक्षण, मोफत शिक्षण, मागासलेल्यांचे शिक्षण, सामाजिक सुधारणा वगेरे गोष्टींस आम्ही प्रतिकूल नाही व नव्हतो, “राष्ट्रीय शिक्षण ब्राह्मणांकरिताच नको आहे, अंत्यजाला, चांभाराला, सोनाराला सर्वांनाच ते शिक्षण मिळाले पाहिजे.” इतकेचं बोलून टिळक थांबत नाहीत तर पुढे, “जातीभेद मोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यास समजले पाहिजे. जातीजातींचे तंटे न होऊ देण्याची जबाबदारी घेणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे..” यवतमाळ अकोला भुसावळ वगैरे सभेचा पाटील यांनी दिलेला उल्लेख खोटा आहे.



गाडगेबाबांची भेट वगैरे उल्लेखला ऐतिहासिक आधार नाही. टिळक काय म्हणतात बघा, “कष्टकर्यांचे मनोबल वाढवतांना टिळक म्हणतात, तुम्ही खालच्या जातीचे आहात म्हणून कमीपणा आजीबात मानू नका, तुम्हा मजुरांमध्ये साधुसंत निर्माण झाले, आणि त्यांच्या चरणी आम्ही ब्राह्मण लीन झालो.” स्पष्टच दिसते की, धर्मनिर्णय, किंवा धर्मप्रवचने कुणा एका जातीची मक्तेदारी आहे हे टिळकांना मान्यच नव्हते. त्याला राष्ट्रवादाची जोड देऊन टिळक विचार आपल्याला सांगतो की जात, धर्म ,वंश हे देशाच्या शासन व्यवस्थेवर कधीही प्रभावी ठरू नयेत. राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकांमधील गुणांचा विकास झाला की कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च पदावर जाण्याचा मार्ग मोकळा आहे, मग तुमची जात, धर्म कुठला का असेना !

 ब्राह्मणेतर आणि त्यातल्या त्यात मराठे यांच्यातले हे गैरसमज दूर करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंद्यांना अखिल भा



रतीय कार्यक्रमाची गरज वाटली, त्यातून ते अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद घेण्याच्या तयारीला लागले. त्यासाठी शिंद्यांना टिळकांची उपस्थिती हवी होतीच. टिळकांनी येऊन भाषण केले, टिळकांच्या भाषणाचा वृत्तांत शिंद्यांच्या शब्दात, “पेशव्यांच्या वेळीही अस्पृश्यांनी भरलेल्या पाखालीतील पाणी ब्राह्मण प्याले...if a god were to tolerate untouchability, I would never recognize him as a god at all…अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच मानणार नाही. ( हे उद्गार ऐकून जो गजर उडाला त्यात मंडप कोसळून पडतोसे वाटले.).. मी येथे आज शरीराने प्रथम आलो आहे, तरी मनाने ह्या चळवाळीत नेहमीच आहे....जुन्या काळी ब्राह्मणांच्या जुलुमाने ही चाल पडली, हे मी नाकारीत नाही. पण ह्या रोगाचे आता निर्मुलन झालेच पाहिजे’ वैगेरे त्यांच्या तोंडचे शब्द भावी इतिहासात दुमदुमत राहतील.” या परिषदेचे अध्यक्ष खुद्द बडोदा संस्थांचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते याची नोंद घेतली पाहिजे. आता हे टीकाकार शाहू फुले यांच्या चळवळीतील चळवळीतील विठ्ठल रामजी शिंदे यानाही खोटं ठरवणार का ? मध्यंतरी असेही ऐकले की लोकमान्यांवर निरर्थक टीका करणाऱ्यांवर आता टिळक कुटुंबातर्फे खटले भरले जाणार आहेत हेही जाता जाता सांगतो.

--- पार्थ बावस्कर ( लेखक, इतिहास अभ्यासक )

Friday, October 2, 2020

'गांधी' जयंतीच्या 'सावरकरी' शुभेच्छा !

 


© पार्थ बावस्कर


"महात्मा गांधींच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांचे नि आपल्या राष्ट्राचे हृदयपूर्वक अभिनंदन करतो. ईश्वराने त्यांना दीर्घायुष्य नि उत्तम आरोग्य द्यावे."

--स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर दि. २ ऑक्टोबर १९४३ 

आज महात्मा गांधीजींचा वाढदिवस !

आपल्या देशात महात्मा विरुद्ध स्वातंत्र्यवीर ही  लढाई गेली कित्येक वर्षे सुरु आहे. अर्थात याचे बिनीचे शिलेदार असतात स्वतःला दोघांचे 'अनुयायी' म्हणवून घेणारे 'भक्त'च !

गांधी आणि सावरकर यांच्यात टोकाचे वैचारिक मतभेद होते हे ऐतिहासिक सत्य आहे. तरीही या मतभेदाच्या पलीकडे जाऊन सावरकरांनी गांधींबद्दल वेळोवेळी काढलेले निवडक उद्गार आजतरी आठवूया. 

१.  मी आता प्रथम अगदी पूर्व काळातील म्हणजेच 1908 मधील गांधीजींचे आणि माझे सार्वजनिक आणि वैयक्तिक संबंध कसे होते ते सांगतो. त्यावेळी गांधीजी सुविख्यात पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या, माझ्या व्यवस्थेखाली आणि मार्गदर्शनाखाली असलेल्या लंडनमधील इंडिया हाऊस मध्ये रहात होतो. तेथे गांधीजी आणि मी मित्र म्हणून एकत्र राहिलो. देशभक्त म्हणून एकत्र काम केले. त्यानंतर काही वर्षांनी ते स्वतः त्यांच्या पत्नीला मला व माझ्या कुटुंबाला भेटावयास आले आणि त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या मैत्रीसंबंधी आणि चालू राजकारणासंबंधी सुखसंवाद करण्यात काही तास घालवले....आमच्या ध्येयात काही प्रकरणी जरी मूलभूत अंतर असले तरीही आमचे परस्परसंबंध, आदर नि सदिच्छा सतत टिकून होती.

 २. १९४३ साली गांधजी उपोषणाला बसल्यानंतर सावरकरांनी काढलेल्या निवेदनातील काही भाग.

...ज्या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात टाकणारे उपोषण आरंभले आहे, ते राष्ट्रच सांगत आहे की या क्षणाला गांधींचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. आपल्या रागावण्याला किंवा चिडण्याला सरकार शरण येण्यापेक्षा आपल्या राष्ट्रीय इच्छेपुढे गांधींनीच नमते घेणे अधिक शक्य आहे. कारण आम्हाला माहीत आहे की, गांधीजींनी अनेकदा महान राष्ट्रहित लक्षात घेऊन नैतिकतेचे अवडंबर न माजविता आपली उपोषणे सोडली आहेत. यासाठी दिल्ली परिषदेला आलेल्या सर्व नेत्यास माझी विनंती आहे की त्यांनी गांधीजींनाच उपोषण सोडण्याची विनंती करावी.

३. कस्तुरबा यांचे निधन झाल्यावर दि. २३ फेब्रुवारी रोजी सावरकरांनी गांधीजींना पाठवलेली तार.

"कस्तुरबांच्या निधनासंबंधी मी हृदयपूर्वक दुःख व्यक्त करतो. विश्वासू पत्नी नि प्रेमळ माता, देव नि मानव यांची सेवा करतांना त्या उदात्त मार्गाने देवाघरी गेल्या, तुमच्या दुःखात सर्व राष्ट्र सहभागी आहे."

- सावरकर

४. गांधीजी स्थानबद्दतेतून सुटल्यावर सावरकरांनी लिहिलेले निवेदन दि. ७ मे १९४४

" गांधीजींचे वाढते वय, वाढता आजार नि खालावलेली प्रकृती लक्षात घेऊन शासनाने गांधींची सुटका केली हे वृत्त ऐकून सर्व देशाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. ही कृती मानवी होती. गांधीजी लवकर बरे होवोत अशी इच्छा मी व्यक्त करतो."

- वि. दा. सावरकर

५. ....माझा नि गांधीजींचा तात्विक नि प्रत्यक्ष मतभेद असला तरी त्याचा वाईट प्रभाव वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामावर होऊ नये अशी दक्षता आम्ही घेत होतो. महात्मा गांधींच्या वधाची अचानक धक्का देणारी बातमी मला समजली तेंव्हाच मी त्या भयंकर आत्मघातकी कृतीचा नि:संदिग्ध शब्दात निषेध केला आणि आजही मी तशाच नि:संदिग्ध शब्दात गांधीवधाचा निषेध करतो.

... एखाद्याच्या वेडेपणामुळे किंवा सामुदायिक प्रक्षोभामुळे करण्यात आलेल्या भयंकर भ्रातृहत्यांचा मी नि:संदिग्ध शब्दात निषेध करतो. प्रत्येक देशभक्त नागरिकाने आपल्या अंत:करणावर हे ऐतिहासिक सत्य करून ठेवावे की यशस्वी झालेली राष्ट्रीय क्रांती आणि नवनिर्मित राज्य यांना विशेषतः परकीय आक्रमणाचा धोका असताना भावभावनांचा प्राण घेणारा अंतर्गत नागरी युद्धासारखा अन्य भयंकर शत्रू नाही.

- सावरकर

( ऐतिहासिक निवेदने )

वर्तमान राजकारणाशी याची सांगड घालणेच नको !

महात्मा आणि स्वातंत्र्यवीर दोघेही वरून बघताहेत फक्त !!

-- © पार्थ बावस्कर

Tuesday, February 18, 2020

शिवजन्मोत्सवाचा "खरा" इतिहास..!

 


 शिवजन्मोत्सवाचा “खरा” इतिहास !
                                -- 
पार्थ बावस्कर 

      छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकाच्या अस्मितेचा,
 अभिमानाचा आणि उदंड भक्तीभावाचा विषय आहे. छत्रपती हे आमचे उर्जास्थान, प्रेरणास्थान ! मात्र हल्ली या जाणत्या राजाच्या नावाभोवती वादाचे वादळ घोंघावू लागले आहे. हे वाद जातीय, राजकीय खरे, पण ते निव्वळ अजाणतेपणामुळे सुरु झालेत असे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे महाराष्ट्रधर्माच्या हिताचे नाही. छत्रपतींच्या जयंतीच्या निमित्ताने समाजातल्या अपसमजुतींचे अभ्यासपूर्ण निराकरण ही महाराजांच्या चरणी समाधानाची आदरांजली ठरेल....
     शिवजयंतीच्या उत्सवाची सुरुवात करण्याचा मान महाराष्ट्राच्या मर्दभूमीकडे आहे याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा उत्सव आरंभिला गेला तो छत्रपतींच्या कर्मभूमीत ! मात्र काळाच्या ओघात आमच्यातील काही नतद्रष्टांनी या उत्सवामागे वादाची वाढले निर्माण केली आणि समाजात तेढ निर्माण होऊ लागली. आजही शिवजयंतीचा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केला नाही तर ज्योतिबा फुल्यांनी तो सुरु केला अशी धारणा बहुजन समाजाची आहे, बहुजन वर्गात हा समज कसा निर्माण झाला ? यामागे तथ्य आणि सत्य किती ? हे समजून, व त्याचे निराकरण करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्यचं आहे.
      पेशवाई नंतर मुख्यतः शाळाशाळातून ग्र्यांट डफ ने लिहिलेला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाई असे म्हणतात, त्याच्या सत्यतेबद्दल शंका घ्यायला जागा असली तरी त्याने किमान शिवाजी महाराजांची आठवण लोकांमाध्ये राहण्यास मदत होत असे. या काळात नीलकंठ जनार्दन कीर्तने या अभ्यासकांनी सगळ्यात आधी यांनी शिवस्मृतीच्या माध्यमातून ग्र्यांट डफ ने जो चुकीचा इतिहास लिहिला, त्यावर हल्ला चढवला होता. दरम्यानच्या काळात १८६५ च्या सुमारास ज्योतीबा फुले रायगडावर गेले होते, त्या प्रसंगाचे वर्णन धनंजय कीर यांनी ज्योतीरावांच्या चरित्रात केले आहे, ते लिहितात, “ज्योतीरावांनी मोठ्या उत्सुकतेने आणि अभिमामाने रायगड पहिला. शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था पाहून त्यांचा जीव हळहळला. त्यांनी दगडधोंडे, कचऱ्याचे ढीग समाधीवरून दूर केले. तेथे स्फूर्ती घेऊन शिवाजी महाराजांवर एक मोठा पोवाडा केला. तो १८६९ मध्ये प्रसिद्ध केला.”
(
महात्मा ज्योतीराव फुले – धनंजय कीर- पान १२७ ज्योतिबा फुल्यांचा हा पोवाडा प्रसिद्ध आहे. सुरुवातीला ब्राह्मण क्षत्रीय संघर्ष, परशुराम या विषयावर तो असला तरी नंतर शिवाजी महाराजांच्या चरित्रातील ठळक संदर्भ देणारा आणि त्यांचे गुणवर्णन करणारा असाच आहे. त्यात ज्योतीबांनी स्वतः छत्रपती शिवरायाचे गुरु रामदास होते असे म्हटले आहे हे महत्वाचे. या पोवाड्याचे नावच मुळी “पवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा” असे आहे. ज्योतीरावांचा पोवाडा त्या काळात बराच गाजला, ब्रिटीश राजवटीमध्ये कुण्या मराठी लेखकाने शिवाजी महाराजांचे गुणवर्णन पोवाड्यातून करावे असा तो पहिलाच पोवाडा असावा बहुदा ! त्याच काळात श्री. उदास यांचे धौम महाबळेश्वर वर्णन, गुंजीकर यांची मोचनगड कादंबरी यानेही शिवाजी महाराजांचा विषय समोर आला होता हे विसरायला नको. ज्योतिबा फुले यांनी शिवजन्मोत्सव सुरु केला असा दावा जेंव्हा केला जातो तेंव्हा नेमका याच पोवाड्याचा संदर्भ दिला जातो. ज्योतिबा रायगडावर गेले, त्यांना स्फूर्ती झाली आणि त्यांनी पोवाडा लिहिला इथवर संदर्भ सापडतात मात्र यावरून ज्योतीबांच्या प्रेरणेतून एका उत्सवात रुपांतर होऊन शिवाजी महाराजांचा उत्सव महाराष्ट्रात सुरु झाला याचा समकालीन ठोस पुरावा सापडत नाही. 

        
     ज्योतीरावांच्या नंतर शिवाजी महाराज यांच्या समाधीची कशी दैना झाली आहे, ती किती वाईट अवस्थेत आहे याबद्दल खुलासा करणारे उद्गार जेम्स डग्लस याने मुंबई आणि पश्चिम हिंदुस्थान या पुस्तकात काढले. नंतरच्या काळात १८८५ च्या सुमारास गोविंद आबाजी वसईकर जोशी हे रायगडावरील समाधीची अवस्था पाहून आले आणि त्यांनी हा वाद निकराने लढवला, त्यांनी यावर सविस्तर पुस्तक लिहिले. दरम्यान पुण्यात महादेव गोविंद रानडे आणि तेलंग यांनी सभा भरवून याबद्दल लोकजागृती केली. या सगळ्याच्या एकत्रित परिणामाने सरकारचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी सरकारकडून पैसेही मंजूर करून घेतले गेले.
   ज्योतीराव फुल्यांनी पोवाडा लिहून जर शिवाजी महाराजांचा उत्सव सुरु झाला असता तर उत्सवाच्या निमित्ताने लोक रायगडावर येत राहिले असते, शिवरायांच्या समाधीची डागडुजी  त्यामुळे जेम्स डग्लस किंवा मग पुढे वसईकर जोशी यांना हा विषय उचलून धरण्याची काय गरज पडली असती ? मात्र तसे झाले नाही, कारण स्पष्ट आहे की फुल्यांच्या काळात असा उत्सव सुरु झालाच नव्हता. तेंव्हाच जर तो सुरु झाला असता तर तो दीर्घकाळ सुरूच राहिला असता. फुल्यांनी जर निकराने शिवाजी उत्सव सुरु केला असता तर वसईकर गुरुजींना लेखन करावे लागलेच नसते, न्यायमूर्ती रानड्यांना पुण्यात सभा घ्याव्या लागल्याच नसत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने देणगीची व्यवस्था केली पण ती इतकी तोकडी होती की हा कायमचा सुटला नाही.

      नंतर पुन्हा १८९४ सालात मि. करकेरिया यांच्या भाषणाने शिवाजी महाराजांचा प्रश्न पुन्हा उसळून आला, त्याचे झाले असे की, १८९४ सालच्या २० एप्रिल रोजी मुंबईचे लेखक आर. पी. करकेरिया यांनी ‘प्रतापगडचा किल्ला’ या विषयावर एशीयाटीक सोसायटीपुढे, एक मुद्देसूद व माहितीने भरलेला निबंध वाचला. यात आणि अफझलखान हा शिवाजी महाराजाना मारायला आला होता, पहिला वार त्याने केला म्हणून महाराजांनी त्यावर प्रतिवार करून त्याला मारले हे पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यांचा हा निबंध बराच गाजला. लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव यापूर्वीच सुरु झालेला होता. त्यामुळे लोक एकत्र येऊ लागले होते, राष्ट्रीय जागृती होऊ लागली की ऐतिहासिक अभिमानाच्या विषयांकडे जास्तीत जास्त लोकांचे लक्ष जाते याचा अनुभव टिळकांना होता, आणि नेमके याच वेळी टिळकांनी शिवाजी महाराजांच्या प्रकरणात लक्ष घातले पुढच्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी केसरीतून शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सध्याच्या स्थितीवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्या चर्चेचा सुपरिणाम होत आहे हे टिळक पाहत होते. शिवाजी महारांच्या पराक्रमाबद्दल सगळे लोक चर्चा खूप करतात, त्यांच्या समाधीची दुरवस्था पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना वाईट वाटते पण आपण महाराष्ट्रीय लोक त्या समाधीच्या उद्धारासाठी काय करतो ? आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो का ? असा सवाल टिळक लोकांना विचारू लागले.
     टिळकांनी १८९५ साली शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल सूचना असा शीर्षकाचा लेख केसरीत लिहिला. करायचे म्हणून स्मारक होणार नाही त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत असे टिळकांना सुचवायचे आहे असे यातून दिसते. टिळक लिहितात, “...शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही मोठ्या कळकळीने व भक्तीने का करावे याबद्दल याहीपेक्षा बलवत्तर कारण म्हणजे आमची, आमच्या राष्ट्राच्या अभ्युद्दयाचा पाया घालणाऱ्या गृहस्थाबद्दलची कृतज्ञताबुद्धी ही होय. ज्याच्या अंगात माणुसकी वास करीत आहे त्यास श्रीशिवाजीमहाराजांच्या समाधीबद्दल आस्था वाटेलच; पण ज्याचा महाराष्ट्र कुळात जन्म झाला आहे, त्यास तर असल्या कृत्याबद्दल विशेष अभिमान, आस्था कळकळ किंवा भक्ती असणे हे त्याचे कुलव्रतच होय.” (केसरी-२ जुलै १८९५)
     ‘श्रीशिवाजीमहाराज यांच्या समाधीबद्दल सूचना’ हा त्यांचा १ जुलै १८९५ चा केसरीतील अग्रलेख वाचनीय आहे. लोकांच्या सहभागातून शिवाजी महाराजांच्या समाधीचे काम होणे किती आवश्यक आहे हेच पटवून देणारा आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की शिवरायांच्या स्मारकासाठी एक विशेष समिती तयार झाली, अर्थात त्यात टिळकांचा समावेश होताच.
      समाधीच्या प्रश्नापासून ते पहिला वाहिला शिवजयंती उत्सव सुरु करेपर्यंत टिळक स्वतः प्रत्येक बारीकसारीक बाबतीत लक्ष घालत होते, हळूहळू वातावरण तापत चालले होते, शिवाजी महाराज हा विषय आणखी पुढे येईल या हेतूने टिळक प्रयत्नशील होते. महाराजांची समाधी रायगडावर असल्याने हा रायगड या निमित्ताने चर्चिला जाऊ लागला होता, मग शिवजन्मोत्सव रायगडावरचं का साजरा होऊ नये ? टिळकांच्या मनातला प्रश्न त्यांना खूप काही सांगून जात होता, शिवजयंतीची सुरुवात रायगडावरून झाली तर त्याचे भविष्यात होणारे परिणाम टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला दिसत होते.
      रायगडावर शिवजयंतीचा पहिलावहिला उत्सव कसा साजरा झाला, याची आठवण शिवरामपंत परांजपे यांनी लिहिली आहे, त्याचा काही भाग वाचला म्हणजे टिळक या उत्सवासाठी कसे आतुर झाले होते हे आपल्या लक्षात येईल, पंत लिहितात “लोकमान्य त्या छावणीमध्ये आल्यानंतर रात्रभर तेथे विश्रांती घेतील आणि नंतर ते पहाटेस गड चढून वर जातील अशी पुष्कळांची साहजिकच कल्पना होती. पण हा कार्यक्रम अविश्रांत श्रम करण्याची सवय असलेल्या लोकमान्यांच्या उत्साही धडाडीला मुळीच पसंत पडला नाही. त्यांनी संध्याकाळचा फराळ झाल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या रात्री गडावर चढून जाण्याचा व तेथे पोचून मग झोप घेण्याचा निश्चय ठरवला. त्यांच्याबरोबर जी मंडळी पहाटेस उठून वर जाणार होती, त्या लोकांनीही लोकमान्यांच्याच समागमामध्ये रायगडावर चढून जाण्याची तयारी चालवली. अशा रीतीने शेकडो लोक इतक्या रात्री रायगड चढून जाण्याचे धाडस करण्याला लोकमान्यांच्या उद्दीपक उदाहरणामुळे उद्युक्त झाले.  लगेच शेकडो मार्गदर्शक मजुरांनी आपल्या चुडी पेटवल्या. ओझेवाल्या मजुरांनी आपल्या पाहुणे मंडळींचे बोजे आपल्या डोक्यावर घेतले आणि चारपाच लोकांच्या दरम्यान एकेक चुडवाला मनुष्य असा रीतीने जवळजवळ चारपाचशे लोक एकेक माणसांची रांग चढून करून चालू लागले....शेकडो चुडी पेटलेल्या असून त्यांची लांबच लांब अशी एक रांग डोंगरातील वळणे घेत घेत वरवर चढत असलेली पाहून तळच्या छावणीमध्ये असलेल्या लोकांना हा डोंगरातील देखावा फारचं मनोवेधक भासला. त्यातच श्रीशिवाजीमहाराजकी जय आणि टिळक महाराज की जय अशा रणगर्जना त्या गडावर होऊ लागल्या आणि त्यांचे प्रतिध्वनी त्या गडाच्या दऱ्याखोऱ्यातून उत्पन्न होऊ लागले त्यावेळी हा सारा रायगड किल्लाच त्या चुडीच्या उजेडामध्ये स्वदेशभक्तीने प्रज्वलित होऊन स्वराज्यसंस्थापनेची भाषा बोलू लागला आहे की काय असा भास झाला. ( लोकमान्य—न.र.फाटक – १०६ )
       शिवजयंतीचा पहिलावाहिला उत्सव दोन दिवसांचा होता, पहिल्या दिवशी टिळकांचे समारोपाचे भाषण जोरदार झाले, इंग्लंडमध्ये क्रॉमवेलचे व फ्रांसमध्ये नेपोलियनचे स्मारक जसे अभिमानाने बांधले आहे तसेच आमच्या शूर पुरुषाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे हे राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे असाच टिळकांच्या बोलण्याचा सूर होता. दुसऱ्या दिवशी आलेले लोक गडावर हिंडले, फिरले, गडाची वाईट अवस्था त्यांना जाणवली, आपल्या तेजस्वी इतिहासाची साक्ष  देणारा गड जो काहीसा एकाकी पडला होता त्याला पुन्हा नव्याने उर्जितावस्था आणावी याची जाणीव कुठेतरी गडावर हिंडतांना लोकांना झाली असावी. उत्सवाचा निमित्ताने तीन हजार लोकांच्या पंगती रायगडावर उठल्या असे तर टिळकांनीचं लिहिले आहे, भोजनानंतर व्याख्याने, कीर्तने झाली. शिवछत्रपतींच्या कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे सध्या हयात असलेले वंशज त्यांचाही या पहिल्यावहिल्या उत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला. पुढील व्यवस्थेसाठी एक विशेष मंडळ नेमण्यात आले. महाडच्या रहिवाशांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नातून हा उत्सव साजरा होत होता, अवघा महाराष्ट्र जरी यात अभिमानाने सहभागी झाला असला तरी महाडच्या लोकांचे विशेष आभार मानण्यात आले. रायगडच्या उत्सवाने शिवभक्तांमध्ये नवचैतन्य संचारले.
       लोकांच्या मनात उफाळणारा हा उत्साह असाच टिकवून ठेवणे हे टिळकांच्या समोरचे आव्हान होते. व्याख्याने, जयजयकार, टाळ्या याचा परिणाम किती काळ टिकून राहिलं याचा भरवसा कोण देणार ? याचा दीर्घकालीन परिणाम व्हावा यासाठी या पाहिल्यावहिल्या शिवजन्मोत्सवाबद्दल टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहिला. टिळकांच्या संकल्पनेतला गणेशोत्सव कसा असावा असा सांगणाऱ्या त्या अग्रलेखाचे शीर्षक होते, “शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव” शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता या उत्सवाचा निमित्ताने त्यांना छत्रपतींची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर न्यायची होती असेच दिसते.  
      
इतिहासात या सगळ्याचे तत्कालीन दस्तऐवज उपलब्ध आहेत. म्हणूनच ज्योतीराव फुले समाधीपाशी गेले त्यांना तेथे पोवाडा स्फुरला या घटनेवरून ज्योतीराव फुल्यांनी हा उत्सव सुरु केला असा दावा करणे मात्र हास्यास्पद ठरते.  ब्राह्मण मराठे यांच्यात नव्याने जातीय तेढ निर्माण व्हावी, आमच्या तरुणांची माथी भडकावीत, अशा हेतूने आमच्याच काही पुढार्यांनी हे वाद लावून दिलेले आहेत. आश्चर्य म्हणजे गुगल, वीकीपीडीया सारख्या समाज माध्यमांवर अशी तथ्यहीन माहिती ठोकून दिली आहे, दुर्दैवाने करोडो लोक या चुकीच्या माहितीला भुलून आजही बळी पडत आहे, त्यापैकी काहींना तरी नेमके सत्य काय याची जाणीव व्हावी, आतातरी शहाणे व्हावे, हाच हे सारे विवेचन करण्याचा हेतू !
                       

      टिळकांनी राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सुरु केलेला शिवाजी उत्सव आज आम्ही जातीय पातळीवर आणून ठेवला हे आमचे दुर्दैव ! शिवजयंती संपवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली असे जेंव्हा आजही काही जबाबदार समजल्या जाणाऱ्या माध्यमांतून सांगितले जाते आणि तरुणांपुढे संभ्रम निर्माण होतात.गणेशोत्सवाची सुरुवात शिवजयंतीपेक्षा आधीचं झाली हे इतिहासाद्वारे सिद्ध झाले असतांना कुठलाही इतिहास न पाहता मनाला आले ते ठोकून देणे आणि मुळात जातीय देवश, ब्राह्मणद्वेष पसरवणे हे जणू व्रत असल्याप्रमाणे आज माध्यमे आणि काही राजकीय शक्ती वागत आहेत. त्यांना थोपवण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे जास्तीत जास्त ऐतहासिक साधने धुंडाळून खरा इतिहास पोहोचंवणे.
      खरंतर गणेशोत्सवाची जेंव्हा सुरुवात झाली तेंव्हा हा उत्सव समाजातील ब्राह्मण मंडळींचा आहे, पूजाअर्चा, कर्मकांड यात लोकांना गुंतवून ठेवणारा आहे अशा प्रकारची चर्चा सुधारक मंडळी करू लागले होते. त्यावेळच्या चर्चेला टिळकांनी उत्तर देऊन हा उत्सव कसा राष्ट्रीय आहे, त्याचे ध्येय कसे मोठे आहे हे सांगितले होते. इथे शिवजयंतीच्या संदर्भात तर शिवाजी महाराजांना देवत्व बहाल होण्याचा धोका अधिक होता, म्हणून सुरुवातीपासून टिळकांना मुख्य हेतू काय, कसा आणि कुठल्या मार्गाने सध्या करून घेता येईल हे सांगणे अधिक हिताचे वाटले असावे. असे अनेक संभाव्य धोके टिळकांनी ओळखले असावेत.या धोक्यांबद्दलही टिळकांनी लिहिले आहे, टिळक म्हणतात, “श्री.शिवछत्रपतींचा उत्सव करण्याचे काय हेतू आहेत हे रायगडावर जी भाषणे झाली त्यात स्पष्ट करून दाखविले होते; तथापि अद्याप कित्येक लोक त्याबद्दल आपला गैरसमज करून घेतात ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट होय.कित्त्येकंस या उत्सवापासून ब्राह्मणांखेरीज इतरांचे काही कल्याण व्हावयाचे नाही असे वाटत आहे व कित्त्येकांस अशी धास्ती आहे की हा उत्सव लवकरच रामनवमीच्या थाटावर जाऊन त्यापासून होण्यासारखे जे हित आहे ते सर्व नाहीसे होईल. परंतु ह्या व असल्याच प्रकारच्या दुसऱ्या कित्त्येक शंका आगदी निराधार आहेत हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.” ( समग्र टिळक खंड ४ – पान ३४ )
       टिळकांचा रोख नेमक्या कोणत्या गैरसमजांच्याबद्दल आहे याची आपण पुढे चर्चा करूच पण तत्पूर्वी शिवजयंती पासून समाजाने नेमके काय घ्यायला हवे, त्याची सुरुवात कोणत्या हेतूने झाली आहे हे पाहणे महत्वाचे आहे हे टिळक सांगतात. एखाद्या कुळाचाराप्रमाणे थोर पुरुषांचे उत्सव व्हायलाच हवेत, माझे कर्तव्य म्हणून मी हे देशकार्य काती घ्यायला हवे, आणि याच हेतूने शिवाजी राजांचा उत्सव सुरु केला जात आहे. पण ज्या लोकांना शिवाजी महाराजांच्या नावाने एकत्र यायला टिळक सांगत होते ते लोक मात्र जातीपातिच्या भांडणात फार पूर्वीपासून व्यग्र होते. एकराष्ट्रीयत्व हे या जातींच्या भांडणात पार विरून गेले की काय अशी अवस्था होती. ब्राह्मण मराठे वाद हे त्याही काळात होतेच. टिळकांना मात्र या निमित्ताने ब्राह्मण वाद मिटवण्याची समेट घडवून आणण्याची आयती संधीच चालून आल्यासारखे झाले. जातीय आवेश ही आपल्या देशातील लोकांमध्ये फार खोलवर जाऊन बसलेली विषवल्ली आहे हे टिळक फार चांगल्या रीतीने जाणत होते, शिवाजीचा उत्सव हा मुठभर ब्राह्मणांनी सुरु केला असे जर लोकांना वाटू लागले तर पुन्हा एकदा समेट घडून येण्याऐवजी त्यांच्यातील दरी वाढेल, भांडणे ताणली जातील हे टिळकांनी ओळखले होते. महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी ब्राह्मण आणि मराठे यांनी एकत्र येणे हे किती गरजेचे आहे हे टिळकांसारख्या द्रष्ट्र्या नेत्याला ठाऊक नसेल तर नवलच. इतिहासही तेच सांगत होता. ब्राह्मण आणि मराठे एकत्र येऊन लढले तेंव्हाच मोठमोठ्या संकटातून महाराष्ट्र सावरू शकला याचे दाखले टिळकांच्या नजरेसमोरून हलत नव्हते, म्हणुनच ब्राह्मण मराठ्यांची युती टिळकांना फार महत्वाची वाटत होती. जातीय मुद्द्यांवर टिळकांनी खडसावून लिहिले आहे, टिळक म्हणतात, “महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातींचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे जर क्न्तेही स्थळ असेल तर ते शिवछत्र पतींचे चरित्र हेच होय, हे छत्रपतींचा उत्सव करणाऱ्या सर्व लोकांनी नेहमी ध्यानात बाळगाव्यास पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण अगर परभू अशा प्रकारचा कोणताही भेद ठेवणे अगदी गैरशिस्त आहे. यंदाच्या उत्सवात  एक दोन ठिकाणी असा प्रकार झाल्याचे ऐकिवात आहे व ही गोष्ट जरी खरी असेल तर वेळीच तिचा बिमोड केला पाहिजे. रायगडावर ज्या तीन हजार लोकांस महाराजांचा प्रसाद म्हणून अन्न वाटण्यात आले ते सर्व मराठे होते ; व पांढरपेशा लोकांस प्रसाद न देता आधी तो सादर मराठे मंडळींस देण्यात आला ही एक मुद्द्याची गोष्ट आहे. रायगडावरील उत्सवात ब्राह्मण भोजनाची रेलचेल होईल असे खोटेच प्रतिपादन करणाऱ्या लोकांनी इकडे विशेष लक्ष पोहोचवले पाहिजे.’’ या वादावर कायमचा पडदा पडावा आणि लोकांची मती जागृत व्हावी म्हणून पुढे तर टिळकांनी शिवाजी आणि ब्राह्मण अशा शीर्षकाचा एक लेखही लिहिला होता.
        या उत्सवाच्या निमित्ताने शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुते मर्यादित न ठेवता त्यांना अखिल भारतीय पातळीवर नेण्याची टिळकांची महात्वाकांक्षा होती असेच दिसते. शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना NATIONAL HERO  अशीच करायची होती. कलकत्याच्या एका भाषणात टिळक म्हणतात, “शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यात जन्मास आले त्यासाठी त्यांना मराठा म्हणावे लागते. पाहिजे तर तुम्ही त्यांना बंगाली समजा. त्यांची चेहेरेपट्टी पाहिल्यास ते राजपुताप्रमाणे दिसतात तेंव्हा त्यांना राजपूत लोकांत गणता येईल. ते कोण होते कुठे जन्मले हे गौण प्रश्न बाजूला सारून राष्ट्रीय दृष्टीने विचार केल्यास त्यांची कामगिरी ही राष्ट्रीय स्वरुपाची होती, असे ध्यानात येईल व त्या कामगिरीकडे पाहूनच त्यांचा गौरव साऱ्या देशाने केला पाहिजे. आपण त्यांच्या कामगिरीतील प्रेरणा घेतली पाहिजे. ह्या प्रेरणेने आजच्या काळात न जाणो एखादा शिवाजीसारखा लोकाग्रणी इतर प्रांतात जन्माला येईल.
      गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजन्मोत्सवसुद्धा महाराष्ट्रानंतर सर्वप्रथम बंगालमध्ये सुरु झाला. बंगालमध्ये तो सुरु होण्याचे कारण गोपाळराव देऊसकर हे होय. त्यांनी टिळकांच्या सांगण्यावरून तिकडे खटपट सुरु केली आणि टिळकांच्या अनुपस्थित बंगालमध्ये शिवजन्मोत्सव घडवून आणला. बंगाली साहित्यात त्याच्या अनेक खुणा सापडतात, विशेषतः गुरुदेव रवींद्र आणि श्रीअरविंद यांच्या साहित्यात हे उल्लेख ठळकपणे सापडतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यात शिवाजी महाराजांचे गुणवर्णन करणारी त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कविता सापडते. त्याचा मराठी अनुवाद श्री. पु.ल. देशपांडे यांनी केलेला आहे. महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यातील संबंध दृढ करणारा आणखीन एक महत्वाचा दुवा म्हणजे योगी अरविंद ! लोकमान्य टिळक आणि योगी अरविंदांचे संबंध फार निकटचे होते. अरविंदांच्या साहित्यात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर आधारित केलेली एक दीर्घ काव्य सापडते. श्री. अरविंदांना, शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातल्या पराक्रमी पुरुषांचा किती अभिमान होता यांच्या अनेक कथा आम्ही स्वतः अरविंदांच्या आश्रमातील त्यांच्या काही अभ्यासू मंडळींकडून नुकतेच ऐकुन आलो आहोत.        
      महाराष्ट्रात तर शिवाजी उत्सव साजरा झालाच पण महाराष्ट्राबाहेर बंगाल, पंजाब आणि इतर सर्वच प्रांतात शिवाजी महाराज शिरोधार्य होऊ लागले, अमेरिका आणि जपानसारख्या परदेशातही शिवजयंती साजरी झाल्याचे उल्लेख सापडतात. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील नेत्यांपेक्षा महाराष्ट्राच्या बाहेरील नेत्यांनी टिळकांच्या शिवजयंतीचे फार कौतुक केलेलं आपल्याला दिसते. अनेक इंग्रज इतिहासकार, तत्कालीन सरकारी अधिकारी यांनी नंतरच्या काळात आपल्या आठवणी लिहिल्या त्यात टिळकांच्या शिवजयंती आणि गणेशोत्सवाचे तोंड भरून कौतुक केल्याचे दिसते. समग्र हिंदुस्थानात शिवाजी महाराजांची कीर्ती यामुळे पसरली आणि  शिवजयंतीच्या उत्सवाला टिळकांच्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
     शिवजयंतीसारख्या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप देणाऱ्या टिळकांना आज आम्ही ते केवळ ब्राह्मण होते म्हणून म्हणून बाजूला टाकतो आणि स्वतःला शहाणे म्हणवून घेतो हे आजच्या समाजाचे वास्तव आहे. दुर्दैवाने ब्राह्मणेतर अशा बहुजन समाजात खूप मोठ्या प्रमाणात हा द्वेष वाढीस  लागावा यासाठी मोठ्या शक्ती कार्यरत झाल्या आहेत, त्या समाज आतून पोखरताहेत. एकीकडे हिंदूपदपादशाहीची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे घेऊन गावभर फिरायचे आणि दुसरीकडे जातीय राजकारणातून हिंदुत्वाला पोखरणाऱ्या शक्तींच्या काव्याला बळी पडायचे, हे कसले शिवप्रेम ?? शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून वाद घालून आपापल्या सोयीने दोनदा जन्मतिथी साजरी करणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की सत्य इतिहास बहुजन समजापर्यंत पोचवायचा, हे तुम्हीच ठरवा ! बाकी, आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर आम्हाला नाचायला डीजे, मुन्नी, शीला, डॉल्बी वाजलेच पाहिजे, नाही का ? नाहीतर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली असं आम्हाला वाटणार कसं ? 

                                            -- पार्थ बावस्कर
                                               ९१४६०१४९८९