Saturday, May 11, 2024

स्वरगंधर्व - एक सिनेमॅटिक स्वरमैफल !

 स्वरगंधर्व - एक सिनेमॅटिक स्वरमैफल !



सुधीर फडके यांच्यावचा बायोपिक रिलीज होऊन आठवडा झाला, पण मध्यंतरी डोळ्यांना झालेल्या इन्फेक्शन मुळे चित्रपट बघायचा राहून गेला, अन्यथा १ मे रोजी पहिल्या शो-ला जायचं ठरवलं होतं. 


बाबूजींच्या तोंडून सावरकरांच्या ‘ने मजसी ने’ कानावर पडल्या आणि मी जागीच खिळलो, तो संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत ! 


मुळात बाबूजींचा संघर्ष लोकांना ज्या माहीत नाही, तो जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा या अंगाने अनेकांनी लिहिलय आतापर्यंत, पण मला तीनचार मोलाच्या गोष्टी सांगायच्यात त्या जरा वेगळ्याच. 


सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुनील बर्वे यांनी बाबूजींच्या व्यक्तिरेखेत ओतलेला जीव बघण्यासाठी हा चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहीन. जवळजवळ अडीच तास बर्वे, तुमच्यावरून नजर हटत नाही हो ! खूप कमाल काम केलंय. मेकअप करुन बाबूजी दिसणं फार कठीण नाही पण जो आंगिक अभिनय केलाय तो खूप मोलाचा. बाबूजींचे हातवारे, गातांना विशिष्ठ शैलीत फिरणारा त्यांचा हात, पेटी धरण्याची तऱ्हा, हे सगळं सुनील बर्वे यांनी लीलया पेललं, बाबूजींची भाषा आत्मसात केली, ती अभिनित केली, हे फार महत्वाचं ! 


चित्रपटाच्या पहिल्या भागात बाबूजिंचीच गाणी त्यांच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर पेरली आहेत, जणू ती त्यांचं आयुष्य डिफाईन करतात अशी. ती फार चपखल वाटतात, त्यांच्या मित्राची आई चहा आणून देते तेंव्हा मागे ‘लिंबलोण उतरू कशी’ हे गीत सुरू होतं, आणि पापण्यांच्या कडा ओलावतात. म्हणून पहिल्या टप्यात पटकथा काहीशी ढिली वाटली तरी प्रेक्षक गाण्यात रमतो. 


दुसऱ्या भागात तर बाबूजींच्या गाण्याची रचना आणि त्याचे प्रसंग आलेत. माडगुळकरांचे आणि त्यांचे सीन्स खुसखुशीत पण भावस्पर्शी आहेत. गीत रामायण निर्मितीचा क्षण तर सगळ्यांच्या हृदयी भिडणारा. माडगुळकर आणि बाबूजी यांच्यासोबतच आशाबाईंच्या भूमिकेला छान  ठेहराव दिला गेलाय, त्यामुळे ती भूमिकाही स्मरणीय. 

डॉ. हेडगेवार आणि अटलजी यांच्या पाहुण्या व्यक्तीरेखा बघून त्या काळात गेल्याच फील येतो. दादरा नगर हवेलीचा सशस्त्र लढा या निमित्ताने पडद्यावर आलाय ही एक वेगळी अचिव्हमेंट, नाहीतरी इतिहासाच्या पुस्तकातून हरवलाय तो केंव्हाच !  


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल प्रेम, आपलुकी, निष्ठा असेल तर चित्रपट बघाच पण नसेल तरीही बघा, संघ हा एकदा आपलं ज्याला म्हणतो त्याच्या पाठीशी कसा उभा राहतो हे कळेल. उगाच नाही एखादं संघटन एक शतक होईतो इतक्या अभिमानाने व्रतस्थ राहू शकतं. सावरकर विचारांची कास धरलेल्या माणसाला किती आणि कसं पोळून निघावं लागतं हेही जाणवेल पडद्यावर बाबूजींना बघून. 


बाबूजींची गाणी मोबाइल, स्पीकर किंवा इतरत्र ऐकतोच ना आपण, पण स्पेशल, त्यांना बघता बघता ती गाणी ऐकायची मजा, अनुभव, अहसास, हवा असेल तर चित्रपटगृहात जा, एक सिनेमॅटिक स्वरमैफल तुम्हाला बघता बघता ऐकायला मिळेल. 


- पार्थ बावस्कर

( लेखक, इतिहास अभ्यासक, नाट्यचित्रपट आस्वादक )